Monday, August 26, 2013

यंदा कर्तव्य आहे !!!
"अहो तुमची मुलगी आता नोकरीला लागून दोन वर्ष होतं आली ना?"
"हो"
"मग काही "स्थळं " वैगरे बघताय कि नाही तिच्यासाठी?"
"  "
"नाही माझ्या मैत्रिणीचा मुलगा आहे हो एकुलता एक आणि तोही engineer  बरं  का?"
" असं का ? माझी मुलगी सुद्धा BE  आहे "
"अच्छा Bsc  का?"
 "नाही हो BE  म्हणजे ती सुद्धा Engineer च आहे. "
"काय सांगता ? वा वा छान . आणि हो मुलगा मुंबईतच नोकरी करतो , स्वतःची जागा आहे अंबरनाथला. मग काय म्हणताय पुढे जायचं का?"
एवढा संवाद केवळ एका बाजूचा ऐकून सुद्धा माझी धडकी भरली. मनात म्हटलं भरले आपले दिवस आता. मग शक्य तितका चेहरा वाईट करून आई कडे पाहत राहिले तेव्हा ती काय समजायचे ते समजली आणि तिने काहीतरी कारण सांगून यंदा कर्तव्य नसल्याचं कळवलं आणि माझा जीव भांड्यात पडला. एकदा का गद्धे पंचविशी पार झाली कि एकूणच सगळ्या नातेवाईकांच्या नजरेत आपली लग्नाच्या बाजारातली so called value  दिसायला लागते आणि मग त्याचा दृश्य परिणाम म्हणून मग ते अमुकचा तमुक लग्नाचा आहे अशी सुरुवात करून आपापल्या परीने पर्याय सुचवायला लागतात . अशा वेळी family  functions  attend करणं मग शिक्षा वाटायला लागते. अशी functions चुकवणं निदान आपल्या हातात तरी असतं पण शेजाऱ्यांच्या कचाट्यातून सुटणं मात्र फार अवघड असतं . ते तर अक्षरश:  बारीक लक्ष ठेवून असतात आपल्या प्रत्येक गोष्टींवर . " फार उशीर होतो नाही हल्ली तुला ?"
" आज सुट्टी असते ना तुला मग कुठे निघालीस एवढी तयार होऊन?" 
एक ना दोन हजार चौकाशांनी अगदी बेजार व्हायला होतं . पण ते आपला शेजारधर्म पाळत असतात त्याला आपण तरी काय करणार.असो या एकंदर सगळ्या चौकश्या आणि "स्थळ" सुचवण्यातून  माझी मात्र मस्त करमणूक होत असते

Saturday, August 3, 2013




काळाच्या ओघात लिहिण  मागे पडलं . दिवसागणिक priorities बदलत गेल्या. जे काही वाटतय ते कोणापाशी तरी बोलून मन मोकळ करायची सवय जडली आणि मी लिहायचं विसरूनच गेले. आज जेव्हा मनात खूप काही साचलय ते कोणासमोर रितं करायची  सोय उरलेली नाहीये म्हणून मग शेवटी पुन्हा लिहावं लागतंय.
खूप खोलवर दुखावल्यागत झालंय आज. म्हणजे मनात नसताना सुद्धा आपण एखादी गोष्ट ठरवतो आणि मग ती गोष्ट पाळण खूप अवघड आहे याची जाणीवही होते आपल्याला पण तरीही केवळ आपण ती गोष्ट कोणासाठी तरी मन मारून पाळतच राहतो. त्यामागे  आपला काही एक उद्देश असतो पण अचानक आपल्याला कळून चुकत कि आपल्या या मन मारून राहण्याला काडीचीही किंमत नाहीये कारण ज्या कोण्या कारणासाठी आपण हे सगळ करतोय मुळात त्याचा उद्देशच सफल होत नाहीये तेव्हा अगदी हताश वाटायला लागतं तसंच काहिसं माझं सध्या झालय. त्यावर मग उपाय म्हणून मी blog खरडत बसलेय. पण त्यानेही काही फरक पडत नाहीये.
त्रागा करून तसंही काही साध्य होणार नाहीच म्हणून इथेच थांबते

Friday, April 22, 2011

स्वप्नांची अनोखी दुनिया तिला भुरळ पाडतेय. 'ती' नुकतीच तिच्या स्वच्छंद फुलपाखरी जगातून किलकिल्या डोळ्यांनी या नव्या विश्वाकडे पाहतेय. आता कुठे तिच्या प्रवासाला सुरुवात होतेय पण तिला मात्र घाई झालीय अंतिम मुक्कामापर्यंत पोहोचण्याची. आजवरच्या तिच्या वाटचालीतले सारे अनुभव ती आता रोजच्या व्यवहारात अंमलात आणणार आहे. प्रत्येक निर्णय घेताना ती तिच्या अनुभवाच्या कसोटीवर तपासून पाहणार आहे. कदाचित ती चुकेल , धडपडेल पण चुकतमाकत कशी का होईना ती या सगळ्यातून तरेल. कधीतरी अपयशही तिची परीक्षा पाहिल. कधी यश सुद्धा चाखायला मिळेल. येणाऱ्या यशापयशाची शिदोरी गाठीशी बांधून या साऱ्या क्षणांना सामोरं जायला ती आता सज्ज झालीय. येणारं प्रत्येक आव्हान ती सर्वशक्तीनिशी पेलणार आहे. आता मुळी मागे वळून पाहायचंच नाही हे तिने पक्क ठरवलंय. असंख्य अडथळ्यांची शर्यत तिची वाट पाहतेय.

Thursday, March 10, 2011

ती

"ती" अवचितपणे माझ्या आयुष्यात आलेली. माझ्याहून वयाने थोड़ी कमीच पण अनुभवाने माझ्याहून थोरली. उत्साहाने सळसळणारी. कोणाचीही भीड़ न बाळगणारी. मन मानेल तेच करणारी. स्वतः ची अशी ठाम मतं असणारी आणि ती लोकांना पटवून देण्यासाठी तावातावाने भांडणारी. थोडीशी हट्टी , थोडीशी चिडखोर पण तितकीच समंजस आणि त्याहून जास्त प्रेमळ.
मला नेहमी तिचं कितीतरी गोष्टींसाठी कौतुक वाटायचं अजुनही वाटतं. ती बऱ्याचदा तिच्या आवाक्याबाहेर असणाऱ्या गोष्टी केवळ मला करायचंच आहे या हट्टापायी करत असे मग त्यातून काही निष्पन्न का होइना. व्यवहारी जगातले नियम तिला कधीच लागू झाले नाहीत आणि पुढे कधी होणारही नाहीत. तिची विचार करण्याची पद्धत सर्वस्वी वेगळी आहे , जगाला ज्यात काही खोट दिसणार नाही नेमकी त्यातच ही शोधून १०० वैगुण्य दाखवू शकेल आणि जे कोणाच्याही पसंतीस उतरणार नाही ते मात्र हिला एकदम पसंत पडेल.
वस्तुंबाबत जरी तिचे विचार असे जगावेगळे असेल तरी माणसांची पारख तिला उत्तम आहे. माणसं जोड़ण्यात तिची हातोटी आहे. तिच्या कक्षेत येणाऱ्या प्रत्येकाला तिच्याविषयी आकर्षण न वाटले तर नवलच इतकी ती लाघवी आहे. ती तिच्या माणसांवर मनापासून प्रेम करते आणि त्यांच्याकडूनही ती तितक्याच प्रेमाची अपेक्षा करते. पण बरयाचदा तिच्या या अपेक्षा पूर्ण होत नाहीत मग मात्र ती खट्टू होते, चिडते क्वचित रडते सुद्धा. तिचा राग आणि रुसवा मात्र अल्पजीवी असतो.
तिच्याबद्दल सांगण्यासारख्या बोलण्यासारख्या कित्येक गोष्टी आहेत पण त्या आज अचानक सुचायचं काही कारण नाही. नाही कसं? "ती" आता बदललीये , खरंच खूप बदललीये. का मीच बदलले असेन?

Wednesday, February 9, 2011

" "

सुचेल काहीतरी म्हणून लिहायला नाही बसलेय , असंच मन मोकळं करावंस वाटतंय म्हणून लिहितेय. समज आणि गैरसमज या दोन शब्दांनी व्यापलंय माझं सध्याचं जगणं. किती म्हणून समज गैरसमजांमध्ये बदलताहेत आणि किती म्हणून गैरसमज मी दूर करतेय याची काही गणतीच नाही. सामोपचाराने बोलून सगळे गैरसमज दूर होतात rather ते दूर करता येतात हा माझा पहिला गैरसमज लवकरच दूर झाला. उलट तसं केल्याने ते अजुनच वाढतात , मी तर असं म्हणेन की त्यामुळे ते अजुनच गडद होतात.
आपण भले नि आपलं काम भलं हा approach मी केव्हाच मागे टाकला आणि मला वाटतं तिथूनच खऱ्या गुंतागुंतीला सुरुवात झाली. उगाच भलभलत्या गोष्टींत नाक खुपसायची सवय जडली आणि माझंच माझ्याभोवती गैरसमजांचं जाळं विणलं गेलं. उगाच कोणीतरी काहीतरी म्हटलं आणि मी आपला त्यावर आंधळेपणाने विश्वास ठेवला हे अगदी नेहमीचंच होऊन बसलं. हळूहळू स्वतः वरचा विश्वासच उडून गेला. कुणाचं मत घेतल्याशिवाय आणि त्यानुसार माझा निर्णय modify केल्याशिवाय मला एक ठाम decision घेताच येईनासा झाला. In short मी परावलंबी होत गेले.
या सगळ्या स्थित्यंतरामुळे म्हणा किंवा आणखी कशामुळे मी आत्मविश्वासच गमावून बसले. सतत कुणाच्या ना कुणाच्या आधाराची गरज वाटायला लागली . पुढे पुढे तर ती इतकी निकडीची वाटू लागली की कुणी भक्कम पाठींबा नसेल तर हात पाय गाळून घ्यायची सवय जडली. सतत कोणीतरी सोबत असावं, माझ्या चुकीच्या किंवा योग्य निर्णयांची जबाबदारी या कोणावरतरी टाकून मला मोकळं होता यावं म्हणून तेवढा भक्कम आधार मी सगळीकडे शोधत सुटले आणि वेळोवेळी मला या ना त्या रुपात ते तसे मिळतही गेले पण आता या सगळ्यावर पूर्णविराम लावायची वेळ येऊन ठेपलीये.

Monday, November 15, 2010

' ग ' ची बाधा

" एवढा कसला गं तोरा तुला?"
" साधं ओळख दाखवायला हसताही येत नाही का तुला ?"
" इंग्लंड ची क़्वीनच समजते ही स्वतःला "
" चार पैसे कमवायची अक्कल नाही तरी एवढी गुर्मी "
मला खरंच कळत नाही या अशा वाक्यांच्या चौकटीत मला सगळे का अडकवू पाहताहेत?
मला नाही आवडत सर्वांच्यात जाऊन मिसळायला. नाही बोलायचं मला कोणाशी. नाही जमत स्वतः हून जाऊन ओळख करायला आणि हो केलेल्या किंवा अनायासे झालेल्या ओळखी लक्षात ठेवून वाटेत गाठभेट झालीच तर ओळखीच तोंडभर हसू पांघरायला.
खरं सांगायचं तर मला मुद्दाम एकटं राहायचा, अलिप्तपणा जपायचा मुळीच सोस नाही पण म्हणून सहज वागवता येण्याजोगं एकटेपण आलंच तर ते नाकारायाचीही माझी इच्छा नाही. बऱ्याचदा आपल्याच विचारात चालताना समोरच्या व्यक्तीची लगेच ओळख पटत नाही आणि मी कोऱ्या चेहऱ्याने तिला सामोरी जाते आणि नेमका इथेच माझ्यावर " गर्विष्ठ " असा शिक्का मारला जातो. अशा वेळी माझा त्या व्यक्तीला टाळण्याचा किंवा दुखावण्याचा अजिबात हेतू नसतो पण एकदा झालेले गैरसमज दूर करणं तितकं सोपं नसतं.
कोण्या समारंभाला किंवा कार्यक्रमाला जायचा मूड नसताना उगाचच कोणाचा मान (?) राखण्यासाठी जाणं मला पटत नाही आणि मग मला लोकं तर्हेवाईक ठरवून मोकळी होतात. अशी नाना लेबलं लावून नेमकं काय साध्य करू पाहतात ते न कळे !

Tuesday, August 24, 2010

रक्षाबंधन

"मनू, तुला भाऊ पाहिजे की बहीण?"
" बsssहीण"..
लहान असताना छोट्या बहिणीच्या जन्माआधी आत्येने विचारलेला हा प्रश्न मी तिला अनपेक्षित उत्तर देवून स्वतः वर तिचा राग ओढवून घेतलेला. हे आता आठवायचं कारण म्हणजे आजचा दिवस. " रक्षाबंधन". दरवर्षी नारळी पौर्णिमेच्या दिवशी या प्रसंगाची मला हटकून आठवण येते आणि माझ्या त्या भाबड्या उत्तराने आत्येचा बदललेला चेहराही नजरेसमोर तरळतो.
राखी पौर्णिमेनिमित्त दरवर्षी आजोळी जाणं. आई आणि मावशीने मामांना राखी बांधल्यावर त्यांना ओवाळणी घातल्यावर मला भाऊ नाही म्हणून मग मी घरभर आरडाओरडा करून धिंगाणा घालणं.. मला आत्ताच्या आत्ता राखी बांधायला भाऊ आणून दे अशा बाळबोध धमक्या देणं आणि शेवटी मग आजीने कोण्या शेजारच्या लहान मुलाला ओवाळणीसाठी काही देवून माझ्यासमोर राखी बांधून घ्यायला आणून उभं करणं. अशा एकना अनेक आठवणी आज मनाच्या काठावर येतात.
मध्येच आठवतं शाळकरी वयातलं रक्षाबंधन. मैत्रिणींसोबत आठ दिवस आधी बाजारात जाऊन घासाघीस करून घेतलेल्या डझनभर रंगीबेरंगी राख्या आणि तेवढ्या राख्या बांधून ओवाळणीत मिळालेली chocolates . खरं सांगायचं तर मला या सणाविषयी जास्त अप्रूप वाटायचं ते राखी बांधल्यावर मिळणाऱ्या ओवाळणीमुळे." यावर्षी दादाने मला अमुक एक गोष्ट ओवाळणी म्हणून दिली " अशी शेखी मिरवणाऱ्या मैत्रिणींचा मला कोण हेवा वाटायचा तेव्हा. पण जसजसा काळ पुढे सरकत गेला तसतशी या सगळ्या गोष्टींची वाटणारी अपूर्वाई ओसरत गेली. आता या गोष्टींचं तितकं कौतुक वाटत नसलं तरी या सणाशी जोडलेल्या आठवणींनी मन हळवं होतं एवढं मात्र नक्की.