Saturday, July 25, 2009

मी लिहिते कारण माझ्यासाठी ते व्यक्त होण्याच एक प्रभावी साधन आहे. बऱ्याच अशा गोष्टी असतात ज्या बोलून नाही व्यक्त करता येत कधी कधी... अगदी उदहारणच द्यायच झाल तर आपला चेहराच कधी कधी खूप बोलून जातो तर कधी तोच कितीतरी गोष्टी लपवतो. एकदम परस्परविरोधी वागतो.प्रत्येक व्यक्तीला एकापेक्षा अनेक चेहरे असणे खरच गरजेच आहे का? का नाही प्रत्येक जण एकाच चेहरयाने वावरू शकत. खरतर या प्रश्नाच उत्तर देण तसं कठीण नाहीये. कारण परिस्थितिनुरूप प्रत्येकाला वागण क्रमप्राप्तच असत. पण तरीही हे परस्परविरोधी चेहरयाच कोड काही सुटत नाही. बरीच जण आपल्याभोवती वावरत असतात . त्यांच्याशी या ना त्या कारणाने आपण जोडले जातो.कधीकधी ही नाती अधिक घट्ट होतात . आणि अचानक त्या व्यक्तीचा प्रथमदर्शनी पाहिलेला चेहरा गड़प होतो आणि एक पूर्णत: भिन्न व्यक्ति म्हणून ती व्यक्ति आपल्याला सामोरी जाते. मला हे वास्तव स्वीकारायला बरच जड़ जात पण एखादी गोष्ट टाळण वाटत तेवढ सोप नाही. मी हे चेहरया मागले चेहरे पाहण सहसा टाळते कारण बहुतेकदा नकोश्या वाटणारया अशा गोष्टी समोर येतात आणि त्या व्यक्ति विषयी एकदम मत बदलते ..अस होण मला खरच नाही आवडत पण न आवडून काय फरक पडणार आहे ? शेवटी जे डोळ्याना दिसते तेच खर मानण एवढच आपल्या हाती उरत .