Wednesday, September 16, 2009

अनुभव

आपण खूप आधी पासून काही गोष्टी निषिद्ध मानत आलेलो असतो. हे जरी खरं असलं ना तरी या गोष्टिंबद्दल मनात कुतूहल नेहमीच जागृत असतं. काही वेळेला परिस्थिति अशी होते की ते कुतूहलच उफाळते आणि या निषिद्ध मानल्या गेलेल्या गोष्टी आपल्या हातून नकळत घडून ही जातात. अशा वेळी या सगळ्याला जितके आपण कारणीभूत असतो तितकीच या सगळ्या मागची पार्श्वभूमी कारणीभूत असते . एकतर अशा गोष्टी ठरवून सवरुन होत नसतात त्या एकतर अपघाताने होतात नाहीतर त्यामागे प्रत्येकाची काही वैयक्तिक कारणं असू शकतात.

हीच गोष्ट जेव्हा माझ्या बाबतीत घडली तेव्हा मला वाटतं की ही दोन्ही कारणं माझ्यासाठी लागू होत नाहीत. मला नक्की सांगता येत नाही की मी असं का वागले किंवा मला असं वागावं असं का वाटलं. एकतर या प्रकारातालं thrill मला अनुभवायचं होतं असाही भाग नाही. बारावीत असताना hallucination विषयी वाचलं होतं ते आता असं अनुभवायला मिळेल असं कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं. माझ्यासाठी फ़क्त हा एक " अनुभव " होता.

एक गोष्ट मात्र नक्की की या सगळ्या प्रकाराने मला स्वतःलाintrospection ची गरज आहे याची जाणीव झाली आणखी एक गोष्ट म्हणजे मला सावरायला खूप मोठी सोबत आहे. झाल्या प्रकाराने मी बऱ्याचजणाना दुखावलं याचही शल्य आहेच.

Monday, September 14, 2009

" उगाच "

ती: " काय झालंय तुला ?, बरं वाटतं नाहीये का?"
तो: "नाही ."
ती : " मग असं का वाटतयं तुझ्या आवाजावरून ?"
तो : " खरंच काही नाही."
ती : " सांगायचं नसेल तर सांगू नकोस पण उगाच खोटं बोलू नकोस ."
तो : " मी खोटं बोलत नाहीये गं."
ती : " मग सांग बघू पटकन काय झालंय ते."
तो : " आता कोणाची शप्पथ घेऊ म्हणजे तुला खरं वाटेल ?"
ती : " घे माझी शप्पथ."
तो : " जाऊ दे."
ती : " आता का जाऊ दे ? आणि मी कुठून जाऊ देऊ ?"
तो : " माझेच डायलॉग मला ना! "
ती : " विषय बदलू नकोस ."
तो : " मी विषय बदलत नाहीये ."
ती : " तुझ्याशी ना बोलणच पाप आहे."
तो : " मग कशाला बोलतेयस, मला काही कॉल्स फ्री नाहीयेत."
ती : " हो ना ? मग कशाला केलायस फोन ?"
तो : " तू रागावलीस माझ्यावर ?"
ती : " मी कशाला रागावू ?"
तो : " तू रागावली आहेस ."
ती : "उगाच काहीतरी ."
तो : " बरं मग सांग काल काय बोलणार होतीस एवढं माझ्याशी ?"
ती : " मी ? तुझ्याशी बोलणार होते काल ?"
तो : " हो. तूच तर म्हणाली होतीस ना की खूप बोलायचय तुझ्याशी म्हणून ."
ती : " हं . बोलणार होते पण आता काही आठवत नाहीये ."
तो : " हे काय आता ?"
ती : " म्हणजे मी विसरले ."
तो : " हे बरंय हां तुझं . माझ्याकडून सगळ बरोबर काढून घेतेस आणि स्वतः ची वेळ आली की घेतलीच यांनी माघार ."
ती : " काहीतरीच काय .. यांत माघार कसली . तू काहीतरी वेगळ नाही बोलू शकत , म्हणजे मला पटेल असं ."
तो : " मी काहीही म्हटलं तरी तुला ते कधी पटणार आहे का ?'
ती : " तुला भांडायचं आहे माझ्याशी ?"
तो : " मला काय वेड लागलयं का दगडावर डोकं आपटून घ्यायला ?'
ती : " म्हणजे मी दगड ना ?'
तो : " हे बघ मला तसं म्हणायचं नव्हतं ."
ती : " मग काय म्हणायचं होतं तुला ?"
तो : " तू ना शब्दशः अर्थ घेतेयस."
ती : " तुझ्याशी बोलणच व्यर्थ आहे ."
तो : " मग कशाला बोलतेयस?"
ती : " यापुढे नाही बोलणार ."
तो : " बघं हं कधीच नाही बोलणार ?"
ती : " "
तो : " ठीक आहे मी ठेवतो मग ."
ती : " "
तो : " बाय ."
ती : " बाय आणि उद्या नक्की फ़ोन कर . मला काही बोलायचय तुझ्याशी ."
तो : " कशाला उगाच एकटाच बडबड़ायची हौस नाहीये मला ."
ती : " तू पुन्हा भांडतोयस माझ्याशी ?"
तो : " नाही गं बाई . चल आता उशीर झालाय आपण उद्या बोलू ."
ती : " हं गुड नाईट . बाय ."
तो : " बाय .."

Saturday, September 12, 2009

जाणीव

आज फ़क्त तुझ्यावर लिहायचं म्हणून Keyboard वरून हलकेच बोटं फिरवली तेव्हा तूच जवळ असल्याचा भास झाला.... आणि telepathy का काय म्हणतात ते माहित नाही मोबाइल वर नेमका तुझाच फ़ोन .. गेल्या कित्येक दिवसांत तुझी काही खबर नसताना अचानक आलेला.. मी काही क्षण खुर्चीत तशीच थिजलेली..भानावर येत फ़ोन उचलला आणि तुझा आवाज ऐकला मात्र नि थेट भूतकाळात शिरले... कसं कोण जाणे सगळ कसं अगदी काल घडल्यासारखं स्वच्छ डोळ्यांसमोर आलं ..

तुझी माझी ओळख अगदी औपचारिकपणे पार पडलेली ...पहाताक्षणी मला भावलेले तुझे निष्पाप डोळे , चेहरया वरचं तुझं निरागस हसू ..नंतर ते सगळ कसं आणि केव्हा विरलं ते आता सांगता येत नाही ..
तुला आठवतं तो कॉलेजचा पहिलाच दिवस होता अर्थात ' माझा पहिला दिवस ' , तुम्ही सगळे केव्हाच जुने होउन गेला होतात .. माझी शेवटची बसही चुकलेली .. कसा कोण जाणे तू अचानक उगवलास .. अगदी अहो जाहो करून बोलायला लागलास आणि माझ्याही नकळत मला हसू फुटलं. तू वेड्यासारखं बघतच राहिलास मग मीच ओशाळले. तेव्हा लगेच अगदी प्रौढाचा आव आणत तू मला माझ्या त्या अनोळखी ठिकाणी ' एकटी ' असल्याची जाणीव करून दिलीस आणि वर माझी जबाबदारी घेतल्याचा आव आणत मला सोबत करण्याची तयारीही ...तुझं हेच वागणं मला कधी उमगलचं नाही रे . तू नेहमी दोन विरुद्ध टोकांना असणारया गोष्टी एकाच वेळी कशा करतोस तुझं तूच जाणो..

नंतर मला स्वच्छ आठवते ती सकाळ आम्ही सगळे कैंटीन मध्ये गप्पा करत चहा घेताना ...तू मात्र कैंटीनच्या बाहेर शुन्यात नजर लावलेला .. खरचं कसला विचार करत होतास एवढा तेव्हा ? विचारायचं राहुनच गेलं ...मी तुला तसं पाहिलं आणि चटकन काय बोलून गेले आठवतच नाही पण आमच्या टेबल वरच्या कुणीतरी तुला मी बोलावल्याचं सांगितलं आणि तू आलास .. अगदी सहज आलास ..का आलास??
जर नसताच आलास तर पुढचं बरच अघटित टळलं असतं.. हे सगळ कधी घडलच नसतं ..
तू नेहमीच मला लहान मुलासारखं treat केलंस आणि हा माझाच मुर्खपणा म्हणुन मी ही ते चालवून घेतलं .. कधी मोठं व्हायचा प्रयत्नही नाही केला रे तुझ्यापुढे.. अगदी एकदा दोनदा ओठांवर आलेले शब्दही निकराने मागे परतवून लावले ..भीती होती तुला मुकण्याची पण कुणास ठावुक म्हणुनच तू माझ्यापासून दुरावला असशील..
जेव्हा असा तू खुप खुप दूर निघून गेलास ना, तेव्हा खुप हताश झाले होते रे मी ,म्हणजे अगदी वेड लागायची पाळी आली होती .. रस्त्यातून चालताना गर्दीत अचानक तुझाच चेहरा दिसे आणि भारावल्यागत मी त्या व्यक्ति मागे चालू लागत असे , भानावर येई तेव्हा कोणत्यातरी भलत्याच रस्त्यावरून चालत असायचे .. असं कितीदा घडलंय तेही नाही आठवतं. अशावेळी इतरांचा एवढा आधार वाटतो म्हणुन सांगू .. किती नाना प्रकारे लोकं तेव्हा माझी समजूत काढत हे आठवलं ना तरी आता त्याचं हसू येतं पण तेही केविलवाणं ..

मग विचार केला काय हा वेडेपणा , कशासाठी हा अट्टाहास ? कितीक प्रश्न डोक्यांत घेउन मी स्वतः लाच भंडावून सोडलं .. मनाच्या वेदना शमवायला शरीराला देता येतील तेवढ्या यातना दिल्या पण खरं सांगू मनू वेळेनेच या सगळ्यावर मात केली रे .. जसजसा काळ पुढे सरकला तसतशा या बोचरया जाणिवा बोथट झाल्या जरी नेणिवेत त्या तितक्याच धारदार असल्या तरी .. कसा कोण जाणे मनावर ताबा मिळवण्यात मी काही अंशी तरी यशस्वी झाले .. तुझं वेगळ आणि माझं एक सर्वस्वी वेगळ विश्व आहे , असू शकतं यावर मीच माझ्यापुरतं शिक्कामोर्तब केलं आणि माझी नवी वाट शोधायला सुरुवात केली तेव्हा जाणवलं की मला माझ्याच सोबतीची खूप गरज आहे ते ...

Wednesday, August 19, 2009

असंबद्ध

कोंडमारा असह्य होतोय.. कित्येक वेळा उगाचच नसते त्रास आपण का करून घेतो ? या प्रश्नाला खरतर ठाम अस उत्तर नाही .. कधी कधी प्रश्नही तेवढा गंभीर नसतो पण आपल्या जीवाला मात्र घोर लागून राहतो .. सगळेच प्रश्न काही सांगून बोलून सुटत नसतात...काही वेळा तर ते चक्क सोडून दिल्यानेही सुटतात पण ते सोडल्याने सुटतीलच याची शाश्वती नाही उलट कधीकधी तर ते अधिकच गहन होत जातात. खरच आपण अस का वागतो? काय मिळत आपल्याला एखाद्याला दुखवून ? पण कळत नकळत आपल्या कडून आपलेच दुखावले जातात.. आणि बऱ्याचदा आपल्याला याची साधी जाणीव सुद्धा नसते ... अस का व्हावं ? एकदा हा प्रश्नांचा गुंता सोडवायला बसलं की तो अधिकच गुंतत जातो.

Saturday, July 25, 2009

मी लिहिते कारण माझ्यासाठी ते व्यक्त होण्याच एक प्रभावी साधन आहे. बऱ्याच अशा गोष्टी असतात ज्या बोलून नाही व्यक्त करता येत कधी कधी... अगदी उदहारणच द्यायच झाल तर आपला चेहराच कधी कधी खूप बोलून जातो तर कधी तोच कितीतरी गोष्टी लपवतो. एकदम परस्परविरोधी वागतो.प्रत्येक व्यक्तीला एकापेक्षा अनेक चेहरे असणे खरच गरजेच आहे का? का नाही प्रत्येक जण एकाच चेहरयाने वावरू शकत. खरतर या प्रश्नाच उत्तर देण तसं कठीण नाहीये. कारण परिस्थितिनुरूप प्रत्येकाला वागण क्रमप्राप्तच असत. पण तरीही हे परस्परविरोधी चेहरयाच कोड काही सुटत नाही. बरीच जण आपल्याभोवती वावरत असतात . त्यांच्याशी या ना त्या कारणाने आपण जोडले जातो.कधीकधी ही नाती अधिक घट्ट होतात . आणि अचानक त्या व्यक्तीचा प्रथमदर्शनी पाहिलेला चेहरा गड़प होतो आणि एक पूर्णत: भिन्न व्यक्ति म्हणून ती व्यक्ति आपल्याला सामोरी जाते. मला हे वास्तव स्वीकारायला बरच जड़ जात पण एखादी गोष्ट टाळण वाटत तेवढ सोप नाही. मी हे चेहरया मागले चेहरे पाहण सहसा टाळते कारण बहुतेकदा नकोश्या वाटणारया अशा गोष्टी समोर येतात आणि त्या व्यक्ति विषयी एकदम मत बदलते ..अस होण मला खरच नाही आवडत पण न आवडून काय फरक पडणार आहे ? शेवटी जे डोळ्याना दिसते तेच खर मानण एवढच आपल्या हाती उरत .