Friday, April 22, 2011

स्वप्नांची अनोखी दुनिया तिला भुरळ पाडतेय. 'ती' नुकतीच तिच्या स्वच्छंद फुलपाखरी जगातून किलकिल्या डोळ्यांनी या नव्या विश्वाकडे पाहतेय. आता कुठे तिच्या प्रवासाला सुरुवात होतेय पण तिला मात्र घाई झालीय अंतिम मुक्कामापर्यंत पोहोचण्याची. आजवरच्या तिच्या वाटचालीतले सारे अनुभव ती आता रोजच्या व्यवहारात अंमलात आणणार आहे. प्रत्येक निर्णय घेताना ती तिच्या अनुभवाच्या कसोटीवर तपासून पाहणार आहे. कदाचित ती चुकेल , धडपडेल पण चुकतमाकत कशी का होईना ती या सगळ्यातून तरेल. कधीतरी अपयशही तिची परीक्षा पाहिल. कधी यश सुद्धा चाखायला मिळेल. येणाऱ्या यशापयशाची शिदोरी गाठीशी बांधून या साऱ्या क्षणांना सामोरं जायला ती आता सज्ज झालीय. येणारं प्रत्येक आव्हान ती सर्वशक्तीनिशी पेलणार आहे. आता मुळी मागे वळून पाहायचंच नाही हे तिने पक्क ठरवलंय. असंख्य अडथळ्यांची शर्यत तिची वाट पाहतेय.

Thursday, March 10, 2011

ती

"ती" अवचितपणे माझ्या आयुष्यात आलेली. माझ्याहून वयाने थोड़ी कमीच पण अनुभवाने माझ्याहून थोरली. उत्साहाने सळसळणारी. कोणाचीही भीड़ न बाळगणारी. मन मानेल तेच करणारी. स्वतः ची अशी ठाम मतं असणारी आणि ती लोकांना पटवून देण्यासाठी तावातावाने भांडणारी. थोडीशी हट्टी , थोडीशी चिडखोर पण तितकीच समंजस आणि त्याहून जास्त प्रेमळ.
मला नेहमी तिचं कितीतरी गोष्टींसाठी कौतुक वाटायचं अजुनही वाटतं. ती बऱ्याचदा तिच्या आवाक्याबाहेर असणाऱ्या गोष्टी केवळ मला करायचंच आहे या हट्टापायी करत असे मग त्यातून काही निष्पन्न का होइना. व्यवहारी जगातले नियम तिला कधीच लागू झाले नाहीत आणि पुढे कधी होणारही नाहीत. तिची विचार करण्याची पद्धत सर्वस्वी वेगळी आहे , जगाला ज्यात काही खोट दिसणार नाही नेमकी त्यातच ही शोधून १०० वैगुण्य दाखवू शकेल आणि जे कोणाच्याही पसंतीस उतरणार नाही ते मात्र हिला एकदम पसंत पडेल.
वस्तुंबाबत जरी तिचे विचार असे जगावेगळे असेल तरी माणसांची पारख तिला उत्तम आहे. माणसं जोड़ण्यात तिची हातोटी आहे. तिच्या कक्षेत येणाऱ्या प्रत्येकाला तिच्याविषयी आकर्षण न वाटले तर नवलच इतकी ती लाघवी आहे. ती तिच्या माणसांवर मनापासून प्रेम करते आणि त्यांच्याकडूनही ती तितक्याच प्रेमाची अपेक्षा करते. पण बरयाचदा तिच्या या अपेक्षा पूर्ण होत नाहीत मग मात्र ती खट्टू होते, चिडते क्वचित रडते सुद्धा. तिचा राग आणि रुसवा मात्र अल्पजीवी असतो.
तिच्याबद्दल सांगण्यासारख्या बोलण्यासारख्या कित्येक गोष्टी आहेत पण त्या आज अचानक सुचायचं काही कारण नाही. नाही कसं? "ती" आता बदललीये , खरंच खूप बदललीये. का मीच बदलले असेन?

Wednesday, February 9, 2011

" "

सुचेल काहीतरी म्हणून लिहायला नाही बसलेय , असंच मन मोकळं करावंस वाटतंय म्हणून लिहितेय. समज आणि गैरसमज या दोन शब्दांनी व्यापलंय माझं सध्याचं जगणं. किती म्हणून समज गैरसमजांमध्ये बदलताहेत आणि किती म्हणून गैरसमज मी दूर करतेय याची काही गणतीच नाही. सामोपचाराने बोलून सगळे गैरसमज दूर होतात rather ते दूर करता येतात हा माझा पहिला गैरसमज लवकरच दूर झाला. उलट तसं केल्याने ते अजुनच वाढतात , मी तर असं म्हणेन की त्यामुळे ते अजुनच गडद होतात.
आपण भले नि आपलं काम भलं हा approach मी केव्हाच मागे टाकला आणि मला वाटतं तिथूनच खऱ्या गुंतागुंतीला सुरुवात झाली. उगाच भलभलत्या गोष्टींत नाक खुपसायची सवय जडली आणि माझंच माझ्याभोवती गैरसमजांचं जाळं विणलं गेलं. उगाच कोणीतरी काहीतरी म्हटलं आणि मी आपला त्यावर आंधळेपणाने विश्वास ठेवला हे अगदी नेहमीचंच होऊन बसलं. हळूहळू स्वतः वरचा विश्वासच उडून गेला. कुणाचं मत घेतल्याशिवाय आणि त्यानुसार माझा निर्णय modify केल्याशिवाय मला एक ठाम decision घेताच येईनासा झाला. In short मी परावलंबी होत गेले.
या सगळ्या स्थित्यंतरामुळे म्हणा किंवा आणखी कशामुळे मी आत्मविश्वासच गमावून बसले. सतत कुणाच्या ना कुणाच्या आधाराची गरज वाटायला लागली . पुढे पुढे तर ती इतकी निकडीची वाटू लागली की कुणी भक्कम पाठींबा नसेल तर हात पाय गाळून घ्यायची सवय जडली. सतत कोणीतरी सोबत असावं, माझ्या चुकीच्या किंवा योग्य निर्णयांची जबाबदारी या कोणावरतरी टाकून मला मोकळं होता यावं म्हणून तेवढा भक्कम आधार मी सगळीकडे शोधत सुटले आणि वेळोवेळी मला या ना त्या रुपात ते तसे मिळतही गेले पण आता या सगळ्यावर पूर्णविराम लावायची वेळ येऊन ठेपलीये.