Tuesday, March 30, 2010

द्विधा

येणारा प्रत्येक क्षण असोशीने जगण्यातली धुंदी उद्याच्या अनिश्चिततेचा विचार करून कशाला उतरवायची ?
पण म्हणजे भविष्याचा विचारच करायचा नाही का? जोवर जे सहज हाती येतंय ते आणि तेवढंच उपभोगत रहायचं ,उद्या कदाचित ते नसेलही हा विचारही मनाला शिवू द्यायचा नाही. पण हा मनाचा दांभिकपणा नाही का?
आयुष्यात येणारा क्षण न क्षण उत्कटतेनं जगताना त्यासोबत येणारी जबाबदारी कशी विसरता येईल ? किंबहुना असं उत्कट जगणंच तर देतं सजग जाणीव आत्मभानाची. तरीही मन का कचरतं अशा क्षणांना सामोरं जायला कसली एवढी भीती वाटत असावी त्याला ? भान सुटण्याची की बेभान होउन सारं उधळून दिल्यावर येणारया रितेपणाची ....
रितेपणाची जाणीवही तशी वेगळीच म्हणजे पूर्णत्वातून येणारया अपुरेपणाची.. म्हणजे पूर्ण असं काही नाहीच . आणि पूर्णत्व म्हणजे तरी काय? या सगळ्या प्रश्नांना उत्तरं नाहीत कारण प्रत्येकाची उत्तरं वेगळी असतात , ती त्यांची त्यांनाच ठरवू देत. इथे मात्र मी स्वतः लाच सोडवू पाहतेय आज आणि उद्याच्या गुंत्यातून.

Sunday, March 21, 2010

मंथन

शब्दामागून शब्द , विचारांमागून विचार एकामागोमाग एक येतच जातात , ती विचारचक्रात गुरफटतच जाते. कधीपासून ती या सर्वात गुंतत गेली काहीच आठवत नाही . पण फार वेळ नसावा झालेला बहुधा . प्रयत्नपूर्वक ती विचारांची शृंखला तोडू पाहते पण तिच्याने ते होत नाही पुन्हा कोणत्यातरी छोट्या गोष्टीपासून सुरू झालेली विचारप्रक्रिया अधिक वेगात फिरू लागते. ती मात्र तशीच निस्तब्ध येणारया प्रत्येक विचाराशी झगड़ण्याचा तोकडा प्रयत्न करत राहते .
तिच्यालेखी ह्या सगळ्या गोष्टी खूप वेगळ्या असतात. तिचं छोटसं , सुरक्षित स्वतः भोवती स्वतः आखून रेखून घेतलेलं जग फार सुन्दर असतं , सोपं असतं ,साधं असतं . आणि आता तिच्यासोबत घडणारया गोष्टी तिच्या परिघाबाहेरच्या असतात. त्या स्वीकारणं नाकारणं सर्वस्वी तिच्या हातात असतं पण त्या स्वीकारणं जितकं तिला झेपणारं नसतं तितकचं ते नाकारणं तिला पेलवणारं नसतं मग तिला त्याचा कितीही त्रास होणार असला तरीही.. कुठेतरी हे सारं मागे काही न ठेवता संपून जावं असा विचार ही तिच्या मनात येतो आणि त्याच्यासोबत येते ती हतबुद्ध करणारी बधीरता , साऱ्या संवेदना गोठवून टाकणारी , कधीच न संपणारी ...
ती श्वास मोजू लागते .. एकापाठोपाठ एक येणारे तिचेच श्वास तिला परके वाटू लागतात .. एक , दोन , तीन .. आता तिला अचानक आठवतात तिचे वेगात पडणारे ठोके .. ती कासावीस होते .. लयीत पडणारे संथ श्वास कधीच विरून गेलेत .. पड़ताहेत ते विलक्षण वेगाने धडधडणारे ठोके .. तिला तो आवेग सहन होत नाही .. ती हे सारं थांबवू पाहते ..क्षणात एक विचाराची लकेर उमटते " हा श्वासच थांबला तर .." सारंच संपेल अगदी सारं सारं ...

Monday, March 15, 2010

तक्रार

मला नाही आवडत
तुझं आत्ममग्न राहणं,
विचारांच्या गर्दीत असं
राजरोस विरून जाणं.

तुझं अगदी जवळ असणंही
मला केव्हा केव्हा डाचतं,
कारण तेव्हाही स्वतः त
हरवून बसणं तुला सोप्पं वाटतं .

किती म्हणून छळावं
माणसानं एखाद्याला ,
आधी वेड लावून मग
खुशाल विसरून जावं बिचारयाला.

असं सगळं असलं तरी
मन तुझ्याकडेच धावतं ,
समज-गैरसमजाच्या धुक्यात
तुलाच शोधू पाहतं.

Tuesday, March 9, 2010

आत्मवंचना

"नाही ".
केवळ दोन अक्षरांनी बनलेला हा इवलासा शब्द कधीकधी किती क्लेशदायी ठरतो याचा पुनः एकदा प्रत्यय आला. गेल्या कित्येक दिवसांत मनात एकावर एक साचत गेलेल्या कितीतरी गोष्टी तुझ्यापाशी बोलून मोकळी होऊ पाहत होते. तुझ्या मऊशार शब्दांच्या दुलईत स्वतःला लपेटून घेउन त्यांचं उबदारपण अनुभवायच होतं मला.. पण .. हा "पण"च आडवा आला..
किती सहज " नाही " म्हणता येतं ना तुला .. तसं ते तुझ्याकडून अपेक्षितही होतं कारण कारणांशिवाय उगाचच वेळ दवडण तुझ्या तत्वांत बसत नाही. आणि ही गोष्ट ठावुक असतानाही भाबडेपणान तुझ्या होकाराची आस बाळगणारी व्यक्ति निव्वळ मूर्ख ठरते. सततचा हा स्वतः चा स्वतः शीच मांडलेला वंचनेचा खेळ मग एकदम दुखावुन जातो. या सगळ्याला काय म्हणायचं ते मला ठावुक नाही.
बुद्धि आणि मन या दोन्ही गोष्टी एकच असूच शकत नाहीत कारण जे बुद्धिला पटेल ते मनाला रूचेलच असे नाही. पण तरीही तुझ्या नकाराचं जोखड या दोघांच्या संमतीने उलथवायचा निष्फळ प्रयत्न मात्र करतच आहे ..मीच जाणतेअजाणतेपणी माझ्याभोवती गुंफलेल्या चक्रव्यूहाला भेदायचा हाच काय तो मार्ग असावा ...