Wednesday, February 9, 2011

" "

सुचेल काहीतरी म्हणून लिहायला नाही बसलेय , असंच मन मोकळं करावंस वाटतंय म्हणून लिहितेय. समज आणि गैरसमज या दोन शब्दांनी व्यापलंय माझं सध्याचं जगणं. किती म्हणून समज गैरसमजांमध्ये बदलताहेत आणि किती म्हणून गैरसमज मी दूर करतेय याची काही गणतीच नाही. सामोपचाराने बोलून सगळे गैरसमज दूर होतात rather ते दूर करता येतात हा माझा पहिला गैरसमज लवकरच दूर झाला. उलट तसं केल्याने ते अजुनच वाढतात , मी तर असं म्हणेन की त्यामुळे ते अजुनच गडद होतात.
आपण भले नि आपलं काम भलं हा approach मी केव्हाच मागे टाकला आणि मला वाटतं तिथूनच खऱ्या गुंतागुंतीला सुरुवात झाली. उगाच भलभलत्या गोष्टींत नाक खुपसायची सवय जडली आणि माझंच माझ्याभोवती गैरसमजांचं जाळं विणलं गेलं. उगाच कोणीतरी काहीतरी म्हटलं आणि मी आपला त्यावर आंधळेपणाने विश्वास ठेवला हे अगदी नेहमीचंच होऊन बसलं. हळूहळू स्वतः वरचा विश्वासच उडून गेला. कुणाचं मत घेतल्याशिवाय आणि त्यानुसार माझा निर्णय modify केल्याशिवाय मला एक ठाम decision घेताच येईनासा झाला. In short मी परावलंबी होत गेले.
या सगळ्या स्थित्यंतरामुळे म्हणा किंवा आणखी कशामुळे मी आत्मविश्वासच गमावून बसले. सतत कुणाच्या ना कुणाच्या आधाराची गरज वाटायला लागली . पुढे पुढे तर ती इतकी निकडीची वाटू लागली की कुणी भक्कम पाठींबा नसेल तर हात पाय गाळून घ्यायची सवय जडली. सतत कोणीतरी सोबत असावं, माझ्या चुकीच्या किंवा योग्य निर्णयांची जबाबदारी या कोणावरतरी टाकून मला मोकळं होता यावं म्हणून तेवढा भक्कम आधार मी सगळीकडे शोधत सुटले आणि वेळोवेळी मला या ना त्या रुपात ते तसे मिळतही गेले पण आता या सगळ्यावर पूर्णविराम लावायची वेळ येऊन ठेपलीये.