Monday, November 15, 2010

' ग ' ची बाधा

" एवढा कसला गं तोरा तुला?"
" साधं ओळख दाखवायला हसताही येत नाही का तुला ?"
" इंग्लंड ची क़्वीनच समजते ही स्वतःला "
" चार पैसे कमवायची अक्कल नाही तरी एवढी गुर्मी "
मला खरंच कळत नाही या अशा वाक्यांच्या चौकटीत मला सगळे का अडकवू पाहताहेत?
मला नाही आवडत सर्वांच्यात जाऊन मिसळायला. नाही बोलायचं मला कोणाशी. नाही जमत स्वतः हून जाऊन ओळख करायला आणि हो केलेल्या किंवा अनायासे झालेल्या ओळखी लक्षात ठेवून वाटेत गाठभेट झालीच तर ओळखीच तोंडभर हसू पांघरायला.
खरं सांगायचं तर मला मुद्दाम एकटं राहायचा, अलिप्तपणा जपायचा मुळीच सोस नाही पण म्हणून सहज वागवता येण्याजोगं एकटेपण आलंच तर ते नाकारायाचीही माझी इच्छा नाही. बऱ्याचदा आपल्याच विचारात चालताना समोरच्या व्यक्तीची लगेच ओळख पटत नाही आणि मी कोऱ्या चेहऱ्याने तिला सामोरी जाते आणि नेमका इथेच माझ्यावर " गर्विष्ठ " असा शिक्का मारला जातो. अशा वेळी माझा त्या व्यक्तीला टाळण्याचा किंवा दुखावण्याचा अजिबात हेतू नसतो पण एकदा झालेले गैरसमज दूर करणं तितकं सोपं नसतं.
कोण्या समारंभाला किंवा कार्यक्रमाला जायचा मूड नसताना उगाचच कोणाचा मान (?) राखण्यासाठी जाणं मला पटत नाही आणि मग मला लोकं तर्हेवाईक ठरवून मोकळी होतात. अशी नाना लेबलं लावून नेमकं काय साध्य करू पाहतात ते न कळे !

Tuesday, August 24, 2010

रक्षाबंधन

"मनू, तुला भाऊ पाहिजे की बहीण?"
" बsssहीण"..
लहान असताना छोट्या बहिणीच्या जन्माआधी आत्येने विचारलेला हा प्रश्न मी तिला अनपेक्षित उत्तर देवून स्वतः वर तिचा राग ओढवून घेतलेला. हे आता आठवायचं कारण म्हणजे आजचा दिवस. " रक्षाबंधन". दरवर्षी नारळी पौर्णिमेच्या दिवशी या प्रसंगाची मला हटकून आठवण येते आणि माझ्या त्या भाबड्या उत्तराने आत्येचा बदललेला चेहराही नजरेसमोर तरळतो.
राखी पौर्णिमेनिमित्त दरवर्षी आजोळी जाणं. आई आणि मावशीने मामांना राखी बांधल्यावर त्यांना ओवाळणी घातल्यावर मला भाऊ नाही म्हणून मग मी घरभर आरडाओरडा करून धिंगाणा घालणं.. मला आत्ताच्या आत्ता राखी बांधायला भाऊ आणून दे अशा बाळबोध धमक्या देणं आणि शेवटी मग आजीने कोण्या शेजारच्या लहान मुलाला ओवाळणीसाठी काही देवून माझ्यासमोर राखी बांधून घ्यायला आणून उभं करणं. अशा एकना अनेक आठवणी आज मनाच्या काठावर येतात.
मध्येच आठवतं शाळकरी वयातलं रक्षाबंधन. मैत्रिणींसोबत आठ दिवस आधी बाजारात जाऊन घासाघीस करून घेतलेल्या डझनभर रंगीबेरंगी राख्या आणि तेवढ्या राख्या बांधून ओवाळणीत मिळालेली chocolates . खरं सांगायचं तर मला या सणाविषयी जास्त अप्रूप वाटायचं ते राखी बांधल्यावर मिळणाऱ्या ओवाळणीमुळे." यावर्षी दादाने मला अमुक एक गोष्ट ओवाळणी म्हणून दिली " अशी शेखी मिरवणाऱ्या मैत्रिणींचा मला कोण हेवा वाटायचा तेव्हा. पण जसजसा काळ पुढे सरकत गेला तसतशी या सगळ्या गोष्टींची वाटणारी अपूर्वाई ओसरत गेली. आता या गोष्टींचं तितकं कौतुक वाटत नसलं तरी या सणाशी जोडलेल्या आठवणींनी मन हळवं होतं एवढं मात्र नक्की.

Sunday, August 22, 2010

माघार

तुला मी आता पर्यंत केवळ हसतानाच पाहिलंय... स्वतः खळखळून हसताना आणि सोबत इतरांना हसवताना ...तुझ्या चेहरयात तसं नजरेत भरेल असं काही नाहीच ... पण तुझा मनापासून हसताना पाहिलेला चेहरा सहजी विसरणंही शक्य नाही.. कधी कधी वाटायचं किती happy go lucky माणूस आहे हा. आपल्याला का नाही बुवा जमणार याच्यासारखं वागायला.. पण आता वाटतं नकोच ते ... किती वेळ असं जगाला फसवत आतल्या आत कुढत असताना, हसू पांघरून तू दिवस साजरे करणार?...
तुझ्या वागण्याचे किती असे बोचरे कंगोरे हळूहळू उलगडले मला .. पण त्याचं वाईट वाटलं नाही मला ... कधीच नाही ..वाटला तो विषाद ...तुझ्या नजरेत दिसलेल्या माझ्याबद्दलच्या "परकेपणाचा"...तसं पाहिलं तर आपला काय आणि उपरा काय सगळे तुझ्या दृष्टीने सारखेच...एखादी गोष्ट चटकन बोलून मन मोकळ करणाऱ्यातला तुझा स्वभाव नाहीच.. कारण तुला त्यातली गंमतच अजून उमगलेली नाही ...अगदीच नाईलाज असेल तरच तू काही स्वतः विषयी सांगणार नाहीतर बेमालूमपणे विषय बदलणार ... हे सगळं अगदी ठाऊक असतानाही तुझ्या मनाची होणारी घालमेल पाहून उगाचच मी कातावते.. तुला नाना परीने बोलायला लावायचा आटापिटा करते... पण तू शेवटी " तू" च असतोस .. आणि मला निमूट माघार घ्यावी लागते..

Friday, July 23, 2010

कोरडा पाऊस

पावसात एकत्र भिजायचं आपण भर दुपारी फिरतानाच ठरवलं होतं. गिरगाव चौपाटीवरल्या तापलेल्या वाळूत पावलं चांगलीच पोळून निघाली होती. तिथल्या काला खट्टाची चव अजून जिभेवर रेंगाळते आहे. मला बर्फाचा गोळा खाण तितकस झेपत नाही असं पाहून तू तो हातातून जवळजवळ ओढूनच घेतला होतास आणि माझ्या नव्याकोऱ्या कुर्त्यावर त्याचा डाग पडला , अजूनही तो तसाच आहे. तेव्हा किती चिडले होते मी तुझ्यावर ..
माझ्या काळ्या निळ्या पडलेल्या ओठांवरून अलगद हात फिरवत म्हणाला होतास " पुन्हा केव्हातरी राणी , ओठ बघ कसे निळे पडलेत .."

संध्याकाळी जगाकडे पाठ फिरवून आणि क्षितिजाकडे डोळे लावून बसलेले आपण दोघं.. तू आपल्या उद्याच्या विचारात रमलेला आणि मी ? मी मलाच ठावूक नाही .... अस्ताला जाणाऱ्या सूर्याकडे पाहत तू अलवारपणे माझा हात हातात घेतलास , माझ्या डोळ्यांत डोळे घालून तू काहीतरी बोलणार इतक्यात मीच मानेनेच तुला काही न बोलण्याचा इशारा केला...खरंच काय वाटलं मला तेव्हा कुणास ठावूक पण तेव्हा तुझ्या डोळ्यांत असलेले भाव इतके उत्कट होते की शब्दांनी ती उत्कटता कदाचित व्यक्त झाली नसती..

आज पुन्हा एकदा तशीच त्या किनाऱ्यावर बसून होते... खडकावर आदळणाऱ्या लाटा मोजत ..बेभान होऊन वाहणारा वारा झेलत..आणि तेवढ्यात पावसाची रिपरिप सुरू झाली ..इतका वेळ नुसतेच क्षितिजाकडे डोळे लावून बसलेली मी तुझ्या आठवणींच्या पावसात चिंब भिजून गेले.. मनातला, तुझ्या माझ्या स्वप्नातला " एकत्र पावसात भिजायचा" कधीच न अनुभवलेला क्षण शोधत मी नखशिखांत भिजूनही कोरडीच राहिले ...

Saturday, July 10, 2010

Label

" हल्ली खूप उद्धट झालीयस " इति आई
" तुझ्याशी बोलणंच कठीण होऊन बसलंय " तमाम मित्रपरिवार
" आधी कमवायला शिका आणि मग काय उधळायचे ते उधळा " आमचे तीर्थरूप
" केलीस थोडी तडजोड तर काय बिघडणार आहे तुझं "
आता हे शेवटचं वाक्य कोणाचं आहे ते नेमकं आठवत नाहीये
पण सहसा हि अशीच वाक्य सतत माझ्या कानीकपाळी मारली जात आहेत. तसं पाहता वरवर हि गोष्ट माझ्यासारख्या नालायक व्यक्तीसाठी नेहमीचीच पण आता मात्र दररोज घरी असल्याने दिवसाचे २४ तास यांचा सामना करावा लागतोय. " मौनं सर्वार्थ साधनम " हि उक्ती माझ्यासारख्या फटकळ पामराला तरी किती दिवस आचरता येणार. शेवटी व्हायचं तेच झालं समोरून येणाऱ्या प्रत्येक वाक्बाणाला मी तितक्याच धारदारपणे उत्तर द्यायची नीती अवलंबिली आणि घरादारासकट सगळ्यांशी वैर पत्कारलं. हे सगळं आता किती दिवस आणि कधीपर्यंत चालणार याची अजून तरी मला काहीच कल्पना नाही पण शक्यतो मी लवकरात लवकर या सगळ्याचा निकाल लावण्याचा प्रयत्न करेन जेणेकरून हे शीत(?)युद्ध थंड करता येईल...

Friday, June 4, 2010

आत्मपरिक्षण

" वडिलांची आज्ञा घेतल्यावाचून कोठे घरातून जाऊ नये"
हे वाक्य रोज म्हणजे अगदी दररोज शाळेत प्रार्थनेच्या वेळेला म्हटलं जायचं. तेही अगदी सहज. तेव्हा वाटायचं अरे ही काय वेगळी लक्षात ठेवायची गोष्ट आहे का? बाबांना विचारल्याशिवाय कसं काय घराबाहेर जाणार rather ते तेव्हा अशक्यच वाटायचं आणि जेव्हा अचानक मागे वळून पाहताना जाणवलं की खूप मागे पडले ते दिवस तेव्हा उगाचच मन हुरहुरलं.
आताशा वाटेल तेव्हा पायात चपला अड़कवून मन मानेल तिथे भटकायची सवय जड़लीये. रात्री १२ काय आणि १ काय वेळेला धरबंध म्हणून काही राहिलेलाच नाही. घरातही एव्हाना सगळ्याना याची सवय झालेली असावी. कधी काळी आईला सांगितल्याशिवाय घराबाहेर पाउल ठेवायची माझी बिशाद नव्हती आणि आता तीच मी तिला बाहेर जाताना "मी येते गं " फ़क्त एवढच दारातून ओरडून निरोप घेते.
बाबा घरी असतील तर तेवढं करण्याचीही तसदी मी घेत नाही. आता माझ्या या वागण्याचं समर्थन करण्याचं माझं प्रयोजन नाही पण सहज म्हणून याचं विश्लेषण करावं एवढाच यामागचा माझा हेतू आहे. तर हे असं का? एकतर मला घरातून एवढी जास्त सूट दिली गेली असावी की ती सहज हाताळणं मला जमलं नसावं किंवा माझ्यावर दाखवल्या गेलेल्या विश्वासाचा मी गैरफायदा घेत असेन. कदाचित असही असू शकेल की मी इतकी बेफिकीरपणे वागत असेन की माझ्या भोवताली माझी काळजी करणारी माणसं आहेत या गोष्टीचा विचार करण्या इतपत माझी बुद्धि चालत नसेल. या सगळ्या शक्यता पड़ताळून मी अद्यापही कोणत्या निष्कर्षाप्रत पोहोचलेले नाही.

Tuesday, April 20, 2010

अत्याचार

कुत्रा हा खूप इमानदार प्राणी आहे . आता इमानदार म्हणजे honest हे तुम्हाला माहितच असेल . तर कुत्रा मला खूप म्हणजे खूप आवडतो कारण तो honest असतो. सगळे म्हणतात की कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडंच पण ते निदान वाकडं तरी असतं पण माणसाला तर शेपुटच नसतं तरीही काही लोकांना शेपूट म्हणतात. मी कधी कधी मारुतीच्या शेपटासारखं लांबलचक बोलत असते असं आई म्हणते पण तिने मारूतीचं शेपूट केव्हा पाहिलं कोणास ठावूक. माझे केस जेव्हा लांब म्हणजे खांद्या पेक्षा थोड़े खाली तेवढे लांब होते ना तेव्हा मी त्याची वेणी घालायचे त्यालाही सगळे शेपुटच म्हणायचे मग मला तेव्हा त्या सगळ्यांचा राग यायचा. आता तर मी केसच कापले पण तरीही मला राग येतो. मी खूप रागीट आहे असं माझी छोटी बहिण त्यादिवशी कोणाला तरी सांगत होती पण मी तर तिच्यावर कधी जास्त रागवत सुद्धा नाही. त्यादिवशी फाइल चेक करायला म्हणून सरांकडे कड़े गेले तर ते सुद्धा माझ्यावर रागावले पण मी अजिबात न चिडता गपचुप सगळ ऐकून घेतलं. मला ना त्यांचा सुद्धा खूप राग येतो कधी कधी तर एक ठेवून द्यावीशी पण वाटते पण मग त्यांचं वय आड़ येतं. तसं माझं पण चुकतं कधी कधी पण त्यांनी मोठ्या मनाने माफ़ नको का करायला मला. माझ्या वर्गातले सगळे लोक उगाचच खूप मोठ्याने बोलतात , त्यांच्या आवाजाने माझे कान अगदी बधीर झाले आहेत पण त्यांना हे सांगून काही फायदाच नाहीये उलट ते अजुनच जोराने किंकाळतील. हं तर आजकाल सगळे लोक मला जे वाटतय त्याच्या विरुद्धच वागत सुटले आहेत. मला खूप भूक लागते मग मी सगळ्यांचे डबे खात सुटते तरीही माझं वजन पंचेचाळीशी पार करत नाही. पण मला त्याने काहीच फरक पडत नाही. माझा डेंटिस्ट मला म्हणतो " u need 2 gain sum weight otherwise u wont luk gud". जसं काय सगळ काही फ़क्त छान दिसण्यासाठीच करायचं असतं. मला घराबाहेर पडायला जाम पकतं म्हणजे बोअर मारतं पण तरीही कॉलेज ला जावंच लागतं. कॉलेज मध्ये stairs वर आम्ही खूप tp करतो पण grp मधलं कोणी आलं नसेल तर तेवढी मजा येत नाही. आमच्या भिवपुरी rd ला जो मस्त bridge आहे ना तसा कुठेच नाही.. मी घरी असले की त्या bridge ला खूप मिस करते. त्या bridge ला लागूनच एक आंब्याचं झाड आहे त्याला खूप कैरया लागतात पण त्या काढायला झाडावर चढ़ावं लागतं आणि मला तर झाडावर चढताच येत नाही. मला आता टाइप करायला कंटाळा येतोय म्हणून मी इथेच थांबते आणि एवढं वाचून सुध्धा तुमचं डोकं ठिकाणावर असेल तरच पुन्हा भेटूया ..
ADIOS

Tuesday, March 30, 2010

द्विधा

येणारा प्रत्येक क्षण असोशीने जगण्यातली धुंदी उद्याच्या अनिश्चिततेचा विचार करून कशाला उतरवायची ?
पण म्हणजे भविष्याचा विचारच करायचा नाही का? जोवर जे सहज हाती येतंय ते आणि तेवढंच उपभोगत रहायचं ,उद्या कदाचित ते नसेलही हा विचारही मनाला शिवू द्यायचा नाही. पण हा मनाचा दांभिकपणा नाही का?
आयुष्यात येणारा क्षण न क्षण उत्कटतेनं जगताना त्यासोबत येणारी जबाबदारी कशी विसरता येईल ? किंबहुना असं उत्कट जगणंच तर देतं सजग जाणीव आत्मभानाची. तरीही मन का कचरतं अशा क्षणांना सामोरं जायला कसली एवढी भीती वाटत असावी त्याला ? भान सुटण्याची की बेभान होउन सारं उधळून दिल्यावर येणारया रितेपणाची ....
रितेपणाची जाणीवही तशी वेगळीच म्हणजे पूर्णत्वातून येणारया अपुरेपणाची.. म्हणजे पूर्ण असं काही नाहीच . आणि पूर्णत्व म्हणजे तरी काय? या सगळ्या प्रश्नांना उत्तरं नाहीत कारण प्रत्येकाची उत्तरं वेगळी असतात , ती त्यांची त्यांनाच ठरवू देत. इथे मात्र मी स्वतः लाच सोडवू पाहतेय आज आणि उद्याच्या गुंत्यातून.

Sunday, March 21, 2010

मंथन

शब्दामागून शब्द , विचारांमागून विचार एकामागोमाग एक येतच जातात , ती विचारचक्रात गुरफटतच जाते. कधीपासून ती या सर्वात गुंतत गेली काहीच आठवत नाही . पण फार वेळ नसावा झालेला बहुधा . प्रयत्नपूर्वक ती विचारांची शृंखला तोडू पाहते पण तिच्याने ते होत नाही पुन्हा कोणत्यातरी छोट्या गोष्टीपासून सुरू झालेली विचारप्रक्रिया अधिक वेगात फिरू लागते. ती मात्र तशीच निस्तब्ध येणारया प्रत्येक विचाराशी झगड़ण्याचा तोकडा प्रयत्न करत राहते .
तिच्यालेखी ह्या सगळ्या गोष्टी खूप वेगळ्या असतात. तिचं छोटसं , सुरक्षित स्वतः भोवती स्वतः आखून रेखून घेतलेलं जग फार सुन्दर असतं , सोपं असतं ,साधं असतं . आणि आता तिच्यासोबत घडणारया गोष्टी तिच्या परिघाबाहेरच्या असतात. त्या स्वीकारणं नाकारणं सर्वस्वी तिच्या हातात असतं पण त्या स्वीकारणं जितकं तिला झेपणारं नसतं तितकचं ते नाकारणं तिला पेलवणारं नसतं मग तिला त्याचा कितीही त्रास होणार असला तरीही.. कुठेतरी हे सारं मागे काही न ठेवता संपून जावं असा विचार ही तिच्या मनात येतो आणि त्याच्यासोबत येते ती हतबुद्ध करणारी बधीरता , साऱ्या संवेदना गोठवून टाकणारी , कधीच न संपणारी ...
ती श्वास मोजू लागते .. एकापाठोपाठ एक येणारे तिचेच श्वास तिला परके वाटू लागतात .. एक , दोन , तीन .. आता तिला अचानक आठवतात तिचे वेगात पडणारे ठोके .. ती कासावीस होते .. लयीत पडणारे संथ श्वास कधीच विरून गेलेत .. पड़ताहेत ते विलक्षण वेगाने धडधडणारे ठोके .. तिला तो आवेग सहन होत नाही .. ती हे सारं थांबवू पाहते ..क्षणात एक विचाराची लकेर उमटते " हा श्वासच थांबला तर .." सारंच संपेल अगदी सारं सारं ...

Monday, March 15, 2010

तक्रार

मला नाही आवडत
तुझं आत्ममग्न राहणं,
विचारांच्या गर्दीत असं
राजरोस विरून जाणं.

तुझं अगदी जवळ असणंही
मला केव्हा केव्हा डाचतं,
कारण तेव्हाही स्वतः त
हरवून बसणं तुला सोप्पं वाटतं .

किती म्हणून छळावं
माणसानं एखाद्याला ,
आधी वेड लावून मग
खुशाल विसरून जावं बिचारयाला.

असं सगळं असलं तरी
मन तुझ्याकडेच धावतं ,
समज-गैरसमजाच्या धुक्यात
तुलाच शोधू पाहतं.

Tuesday, March 9, 2010

आत्मवंचना

"नाही ".
केवळ दोन अक्षरांनी बनलेला हा इवलासा शब्द कधीकधी किती क्लेशदायी ठरतो याचा पुनः एकदा प्रत्यय आला. गेल्या कित्येक दिवसांत मनात एकावर एक साचत गेलेल्या कितीतरी गोष्टी तुझ्यापाशी बोलून मोकळी होऊ पाहत होते. तुझ्या मऊशार शब्दांच्या दुलईत स्वतःला लपेटून घेउन त्यांचं उबदारपण अनुभवायच होतं मला.. पण .. हा "पण"च आडवा आला..
किती सहज " नाही " म्हणता येतं ना तुला .. तसं ते तुझ्याकडून अपेक्षितही होतं कारण कारणांशिवाय उगाचच वेळ दवडण तुझ्या तत्वांत बसत नाही. आणि ही गोष्ट ठावुक असतानाही भाबडेपणान तुझ्या होकाराची आस बाळगणारी व्यक्ति निव्वळ मूर्ख ठरते. सततचा हा स्वतः चा स्वतः शीच मांडलेला वंचनेचा खेळ मग एकदम दुखावुन जातो. या सगळ्याला काय म्हणायचं ते मला ठावुक नाही.
बुद्धि आणि मन या दोन्ही गोष्टी एकच असूच शकत नाहीत कारण जे बुद्धिला पटेल ते मनाला रूचेलच असे नाही. पण तरीही तुझ्या नकाराचं जोखड या दोघांच्या संमतीने उलथवायचा निष्फळ प्रयत्न मात्र करतच आहे ..मीच जाणतेअजाणतेपणी माझ्याभोवती गुंफलेल्या चक्रव्यूहाला भेदायचा हाच काय तो मार्ग असावा ...

Thursday, January 7, 2010

?????????

आज कसा कोण जाणे तुला इतका वेळ माझ्याशी बोलायला मिळाला. तुझं हे तसं नेहमीचच आहे . अगदी अपेक्षेने तुझी वाट पहावी तर दिवस दिवस तुझी गाठभेट नाही आणि ती बघण सोडून देऊन दुसऱ्या कशाततरी मन रमवावं तर नेमका तेव्हाच तुला माझ्याशी बोलण्याचा वेळ व्हावा ..
इकडून तिकडून गप्पा शेवटी तुझ्यावरच स्थिरावल्या तेव्हा एकदम खालच्या सुरात बोलायला लागलास . तेव्हाच जाणवलं की काहीतरी बिनसलयं. खोदून खोदून विचारलं तेव्हा तू तिच्याबद्दल सांगितलसं.
शरीराने एखाद्या व्यक्तीच्या जवळ असणं वेगळं आणि मनानं जवळ असणं वेगळं हे मी आजवर स्वतः ला कितीदा बजावलंय पण ते मला कधीच पटलं नाही . केवळ शारीरिक भूक भागवणं हेच इतिकर्त्तव्य असल्यासारखं कशी काय लोकं वागू शकतात हे अद्याप मला तरी कळलेलं नाही आणि त्या लोकांत तुला पाहणं मी नेहमीच टाळत आलेय. पण सत्य काही नजरेआड केल्याने ते तसं नाही असं होत नाही .

तुला खूप स्पष्ट बोलता येतं मग ते कितीही अवाच्य असलं तरीही ..पण मला ते ऐकताही येत नाही रे ..तुझ्या प्रत्येक शब्दाला हुंकार देतानाही गळा दाटून येतो .कितीही नाकारायचं म्हटलं तरी जे सत्य आहे ते फणा काढून डोळ्यांसमोर येते , मनाचा तोल जातो . सावरू म्हटलं तरी मनाला सावरता येत नाही आणि शेवटी बांध फुटून निरंतर डोळे झरत राहतात..

तरीही स्वतः ला प्रश्न विचारत राहते कशासाठी हे अश्रू ?
स्वतः साठी ? तुझ्यासाठी ? की " तिच्यासाठी "?