Friday, July 23, 2010

कोरडा पाऊस

पावसात एकत्र भिजायचं आपण भर दुपारी फिरतानाच ठरवलं होतं. गिरगाव चौपाटीवरल्या तापलेल्या वाळूत पावलं चांगलीच पोळून निघाली होती. तिथल्या काला खट्टाची चव अजून जिभेवर रेंगाळते आहे. मला बर्फाचा गोळा खाण तितकस झेपत नाही असं पाहून तू तो हातातून जवळजवळ ओढूनच घेतला होतास आणि माझ्या नव्याकोऱ्या कुर्त्यावर त्याचा डाग पडला , अजूनही तो तसाच आहे. तेव्हा किती चिडले होते मी तुझ्यावर ..
माझ्या काळ्या निळ्या पडलेल्या ओठांवरून अलगद हात फिरवत म्हणाला होतास " पुन्हा केव्हातरी राणी , ओठ बघ कसे निळे पडलेत .."

संध्याकाळी जगाकडे पाठ फिरवून आणि क्षितिजाकडे डोळे लावून बसलेले आपण दोघं.. तू आपल्या उद्याच्या विचारात रमलेला आणि मी ? मी मलाच ठावूक नाही .... अस्ताला जाणाऱ्या सूर्याकडे पाहत तू अलवारपणे माझा हात हातात घेतलास , माझ्या डोळ्यांत डोळे घालून तू काहीतरी बोलणार इतक्यात मीच मानेनेच तुला काही न बोलण्याचा इशारा केला...खरंच काय वाटलं मला तेव्हा कुणास ठावूक पण तेव्हा तुझ्या डोळ्यांत असलेले भाव इतके उत्कट होते की शब्दांनी ती उत्कटता कदाचित व्यक्त झाली नसती..

आज पुन्हा एकदा तशीच त्या किनाऱ्यावर बसून होते... खडकावर आदळणाऱ्या लाटा मोजत ..बेभान होऊन वाहणारा वारा झेलत..आणि तेवढ्यात पावसाची रिपरिप सुरू झाली ..इतका वेळ नुसतेच क्षितिजाकडे डोळे लावून बसलेली मी तुझ्या आठवणींच्या पावसात चिंब भिजून गेले.. मनातला, तुझ्या माझ्या स्वप्नातला " एकत्र पावसात भिजायचा" कधीच न अनुभवलेला क्षण शोधत मी नखशिखांत भिजूनही कोरडीच राहिले ...

Saturday, July 10, 2010

Label

" हल्ली खूप उद्धट झालीयस " इति आई
" तुझ्याशी बोलणंच कठीण होऊन बसलंय " तमाम मित्रपरिवार
" आधी कमवायला शिका आणि मग काय उधळायचे ते उधळा " आमचे तीर्थरूप
" केलीस थोडी तडजोड तर काय बिघडणार आहे तुझं "
आता हे शेवटचं वाक्य कोणाचं आहे ते नेमकं आठवत नाहीये
पण सहसा हि अशीच वाक्य सतत माझ्या कानीकपाळी मारली जात आहेत. तसं पाहता वरवर हि गोष्ट माझ्यासारख्या नालायक व्यक्तीसाठी नेहमीचीच पण आता मात्र दररोज घरी असल्याने दिवसाचे २४ तास यांचा सामना करावा लागतोय. " मौनं सर्वार्थ साधनम " हि उक्ती माझ्यासारख्या फटकळ पामराला तरी किती दिवस आचरता येणार. शेवटी व्हायचं तेच झालं समोरून येणाऱ्या प्रत्येक वाक्बाणाला मी तितक्याच धारदारपणे उत्तर द्यायची नीती अवलंबिली आणि घरादारासकट सगळ्यांशी वैर पत्कारलं. हे सगळं आता किती दिवस आणि कधीपर्यंत चालणार याची अजून तरी मला काहीच कल्पना नाही पण शक्यतो मी लवकरात लवकर या सगळ्याचा निकाल लावण्याचा प्रयत्न करेन जेणेकरून हे शीत(?)युद्ध थंड करता येईल...