Tuesday, August 24, 2010

रक्षाबंधन

"मनू, तुला भाऊ पाहिजे की बहीण?"
" बsssहीण"..
लहान असताना छोट्या बहिणीच्या जन्माआधी आत्येने विचारलेला हा प्रश्न मी तिला अनपेक्षित उत्तर देवून स्वतः वर तिचा राग ओढवून घेतलेला. हे आता आठवायचं कारण म्हणजे आजचा दिवस. " रक्षाबंधन". दरवर्षी नारळी पौर्णिमेच्या दिवशी या प्रसंगाची मला हटकून आठवण येते आणि माझ्या त्या भाबड्या उत्तराने आत्येचा बदललेला चेहराही नजरेसमोर तरळतो.
राखी पौर्णिमेनिमित्त दरवर्षी आजोळी जाणं. आई आणि मावशीने मामांना राखी बांधल्यावर त्यांना ओवाळणी घातल्यावर मला भाऊ नाही म्हणून मग मी घरभर आरडाओरडा करून धिंगाणा घालणं.. मला आत्ताच्या आत्ता राखी बांधायला भाऊ आणून दे अशा बाळबोध धमक्या देणं आणि शेवटी मग आजीने कोण्या शेजारच्या लहान मुलाला ओवाळणीसाठी काही देवून माझ्यासमोर राखी बांधून घ्यायला आणून उभं करणं. अशा एकना अनेक आठवणी आज मनाच्या काठावर येतात.
मध्येच आठवतं शाळकरी वयातलं रक्षाबंधन. मैत्रिणींसोबत आठ दिवस आधी बाजारात जाऊन घासाघीस करून घेतलेल्या डझनभर रंगीबेरंगी राख्या आणि तेवढ्या राख्या बांधून ओवाळणीत मिळालेली chocolates . खरं सांगायचं तर मला या सणाविषयी जास्त अप्रूप वाटायचं ते राखी बांधल्यावर मिळणाऱ्या ओवाळणीमुळे." यावर्षी दादाने मला अमुक एक गोष्ट ओवाळणी म्हणून दिली " अशी शेखी मिरवणाऱ्या मैत्रिणींचा मला कोण हेवा वाटायचा तेव्हा. पण जसजसा काळ पुढे सरकत गेला तसतशी या सगळ्या गोष्टींची वाटणारी अपूर्वाई ओसरत गेली. आता या गोष्टींचं तितकं कौतुक वाटत नसलं तरी या सणाशी जोडलेल्या आठवणींनी मन हळवं होतं एवढं मात्र नक्की.

Sunday, August 22, 2010

माघार

तुला मी आता पर्यंत केवळ हसतानाच पाहिलंय... स्वतः खळखळून हसताना आणि सोबत इतरांना हसवताना ...तुझ्या चेहरयात तसं नजरेत भरेल असं काही नाहीच ... पण तुझा मनापासून हसताना पाहिलेला चेहरा सहजी विसरणंही शक्य नाही.. कधी कधी वाटायचं किती happy go lucky माणूस आहे हा. आपल्याला का नाही बुवा जमणार याच्यासारखं वागायला.. पण आता वाटतं नकोच ते ... किती वेळ असं जगाला फसवत आतल्या आत कुढत असताना, हसू पांघरून तू दिवस साजरे करणार?...
तुझ्या वागण्याचे किती असे बोचरे कंगोरे हळूहळू उलगडले मला .. पण त्याचं वाईट वाटलं नाही मला ... कधीच नाही ..वाटला तो विषाद ...तुझ्या नजरेत दिसलेल्या माझ्याबद्दलच्या "परकेपणाचा"...तसं पाहिलं तर आपला काय आणि उपरा काय सगळे तुझ्या दृष्टीने सारखेच...एखादी गोष्ट चटकन बोलून मन मोकळ करणाऱ्यातला तुझा स्वभाव नाहीच.. कारण तुला त्यातली गंमतच अजून उमगलेली नाही ...अगदीच नाईलाज असेल तरच तू काही स्वतः विषयी सांगणार नाहीतर बेमालूमपणे विषय बदलणार ... हे सगळं अगदी ठाऊक असतानाही तुझ्या मनाची होणारी घालमेल पाहून उगाचच मी कातावते.. तुला नाना परीने बोलायला लावायचा आटापिटा करते... पण तू शेवटी " तू" च असतोस .. आणि मला निमूट माघार घ्यावी लागते..