Thursday, March 10, 2011

ती

"ती" अवचितपणे माझ्या आयुष्यात आलेली. माझ्याहून वयाने थोड़ी कमीच पण अनुभवाने माझ्याहून थोरली. उत्साहाने सळसळणारी. कोणाचीही भीड़ न बाळगणारी. मन मानेल तेच करणारी. स्वतः ची अशी ठाम मतं असणारी आणि ती लोकांना पटवून देण्यासाठी तावातावाने भांडणारी. थोडीशी हट्टी , थोडीशी चिडखोर पण तितकीच समंजस आणि त्याहून जास्त प्रेमळ.
मला नेहमी तिचं कितीतरी गोष्टींसाठी कौतुक वाटायचं अजुनही वाटतं. ती बऱ्याचदा तिच्या आवाक्याबाहेर असणाऱ्या गोष्टी केवळ मला करायचंच आहे या हट्टापायी करत असे मग त्यातून काही निष्पन्न का होइना. व्यवहारी जगातले नियम तिला कधीच लागू झाले नाहीत आणि पुढे कधी होणारही नाहीत. तिची विचार करण्याची पद्धत सर्वस्वी वेगळी आहे , जगाला ज्यात काही खोट दिसणार नाही नेमकी त्यातच ही शोधून १०० वैगुण्य दाखवू शकेल आणि जे कोणाच्याही पसंतीस उतरणार नाही ते मात्र हिला एकदम पसंत पडेल.
वस्तुंबाबत जरी तिचे विचार असे जगावेगळे असेल तरी माणसांची पारख तिला उत्तम आहे. माणसं जोड़ण्यात तिची हातोटी आहे. तिच्या कक्षेत येणाऱ्या प्रत्येकाला तिच्याविषयी आकर्षण न वाटले तर नवलच इतकी ती लाघवी आहे. ती तिच्या माणसांवर मनापासून प्रेम करते आणि त्यांच्याकडूनही ती तितक्याच प्रेमाची अपेक्षा करते. पण बरयाचदा तिच्या या अपेक्षा पूर्ण होत नाहीत मग मात्र ती खट्टू होते, चिडते क्वचित रडते सुद्धा. तिचा राग आणि रुसवा मात्र अल्पजीवी असतो.
तिच्याबद्दल सांगण्यासारख्या बोलण्यासारख्या कित्येक गोष्टी आहेत पण त्या आज अचानक सुचायचं काही कारण नाही. नाही कसं? "ती" आता बदललीये , खरंच खूप बदललीये. का मीच बदलले असेन?